आज सकाळची गोष्ट .
बायकोला स्वैपाक करता करताच, आठवण झाली असावी.
स्वैपाकघरातून मोठ्या आवाजात ओरडून तिने मला विचारले-
"अहो, तुम्ही उद्या उपास करणार आहात का ?
मोठ्ठी एकादशी आहे, म्हणून विचारतेय.
मी तरी उपास करणार आहे. "
मीही तेवढ्याच आवाजात उत्तरलो-
" तू करणार आहेस ना उपास ? मग मीही करणार !
अग, तेवढीच तुझ्या स्वैपाकाला आणि आपल्या पोटोबाला विश्रांती मिळून, थोडेफार पुण्य त्यानिमित्ताने पदरात पाडून घेता येईल ! "
दुपारचे जेवण झाल्यावर अंमळ पहुडलो.
तेवढ्यात, बाईसाहेब एक भला मोठ्ठा कागद घेऊन
माझ्यासमोर हजर !
मी कागद घेतला. उद्याच्या "उपासाच्या पदार्थां"ची यादी होती ...
मी वाचू लागलो-
" साबूदाणा, भगर, शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, चिक्की,
वेफर्स, रताळी, केळी, डाळिंब, पेरू, सफरचंद, चिक्कू,
बटाटा चिवडापाकिट, उपासाची बिस्किटे, खजूर......इ. इ. "
अबबबब ! मोठ्ठ्या एकादशीच्या "उपासा"ची ही एवढी मोठ्ठी तयारी ?
मी चक्रावून गेलो. पण एक आज्ञाधारक नवरा असल्याने,
नंदीबैलासारखी मान हलवत,
मुकाट्याने पिशव्या घेण्यासाठी जागचा उठलो ...
...... माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच-
शंभर किलो वजनाच्या बायकोला खरच उपास कसा काय ब्वा पेलणार !
.